प्रतापसिंह राजेभोसले (इ.स. १७३८ ते १७६३)
प्रतापसिंह हे तुळजा राजा पहिले यांचे कट्यारीशी लग्न लावलेल्या स्त्रीचे म्हणजेच अन्नपूर्णाबाईचे पुत्र होते.
तंजावरच्या शिलालेखात स्पष्ट उल्लेख आहे की,
" प्रताप सिंहाची माय राजाची समजातीची झाली याकरिता हा पुत्रच राज्यात योग्य म्हणून सर्वत्रांनी निष्कर्ष केला"
प्रताप सिंह यांची कारकीर्द धामधुमीचे झाली. प्रताप सिंहांना आपल्या दरबारातील यवन सरदार सय्यद खान व सय्यद कासिम आणि अर्काटचा नवाब चंदासाहेब यांच्या संयुक्त कारस्थानात तोंड द्यावे लागले. सय्यद खाद आणि सय्यद काशीद यांच्याकडे तंजावरच्या किल्ल्याची आणि राज्यात चिटणिसी असे मोठे अधिकार होते. आपल्या हातात सत्ता यावी म्हणून सय्यद खान व सय्यद कासीम प्रयत्न करीत होते. प्रतापसिंह राजेभोसले मात्र हुशार आणि व्यवहार चतुर असल्यामुळे त्यांनी सय्यद खान व सय्यद कासम यांचा बंदोबस्त केला.
यासमयी चंदासाहेबाने दोन महिने दिलेल्या वेढ्यात (१७४०) आपली शक्ती अपुरी पडत आहे असे वाटून प्रतापसिंहाने शाहूकडे मदत मागितली. मराठ्यांनी १७४१ मध्ये चंदा साहेबाचा पूर्ण पराभव केला व त्यास कैद केले. अर्काटचा नवाब व चंदासाहेब या दोघांचाही पराभव झाल्यामुळे तंजावरच्या प्रतापसिंहास आनंद झाला. बृहदीश्वर शिलालेखात म्हटले आहे की, "प्रताप सिंह याने आपला कारभारी नापास शेडगे यास रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले यांच्या अभिनंदनासाठी पाठविले."
9 मार्च १७६२ रोजी प्रतापसिंहांनी मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड यांना पत्र लिहिले त्यात शाहू महाराजांचे मदत घेऊन आपणास तंजावरचा बचाव करावा लागला हे अगदी स्पष्ट लिहिले आहे.
पुढे जून १७६२ मध्ये तंजावरकरांचे आणि चंदासाहेबाचे पुन्हा घनघोर युद्ध झाले. यात प्रतापसिंहांचे सरदार मानाजी जगताप यांनी चंदासाहेबास पकडून ठार मारले.
१७ डिसेंबर १७६३मध्ये प्रतापसिंहांचा मृत्यू झाला, आणि दुसरा तुळजा राजा तंजावरच्या गादीवर आला. प्रतापसिंहाच्या काळात स्थापत्य व शिल्पकलेचा बराच विकास झाला. कुंभकोणम आणि चिदंबरम येथील देवालयाचा जीर्णोद्धार केला गेला. साहित्य क्षेत्रातही प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती झाली. प्रताप सिंह यांनी संस्कृत, मराठी, तामिळ, तेलगू भाषांतून रचना केल्या. राम पंडित, अंबाजी पंडित, शिवराम गोविंदासारख्या कवींना आणि आश्रय दिला.
मराठी संस्कृतीचा विचार करता तंजावर करांनी साहित्य आणि कलाक्षेत्रात जी भर घातली आहे तिचा विचार करणे किती आवश्यक आहे ते प्रतापसिंहाच्या कारकीर्दीत झालेल्या कला विकासावरून दिसून येते.