बालपण व सुरुवातीचा काळ
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
शहाजीराजे भोसले हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले.आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई (आई)
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
मार्गदर्शकयुद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांचेकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.
पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण
इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.
अफझलखान वध
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला.हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. वाटेत खानाच्या सैन्याने तुळजापूर व विठ्ठल मंदीराची नासधूस केली. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निःशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना होती. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.
आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
कोल्हापूरची लढाई
लढाई
रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेतोजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.
शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.
सिद्दी जौहरचे आक्रमण
अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले
पावनखिंडीतील लढाई
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.
शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.
शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.
पुरंदराचा तह
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजी महाराजांचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भाण्डणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी भोसले राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पुरंदरचा तह या विजयानंतर शिवाजी महाराज पश्चिम किनाऱ्यावरील सुरतच्या मुख्य बंदर शहरात दाखल झाले. शहराच्या मोगल राज्यपालांनी शिवाजी महाराजांना बोलवण्यासाठी एक दूत पाठविला, पण शिवाजी महाराजांनी दूताला अटक केली. औरंगजेबाकडून जयसिंग यांच्या नेतृत्वात प्रचंड सैन्याच्या रूपात सूड उगवला. पराभव अपरिहार्य आहे हे समजून शिवाजी महाराजांनी १६६५ च्या जूनमध्ये पुरंदर करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अटींनुसार शिवाजी महाराज शरण जाण्यास तयार झाले.
शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवन्तसिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता.सत्तर हजारांची सेना घेऊन शाहिस्तेखान गेला व तीन बोटे गमावून माघारी आला. दिल्लीसम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली.शिवाजी महाराजांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई सम्पुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झाराजा जयसिंह ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झाराजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीला खिण्डार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरन्दर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भण्डारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसन्तगड
२२. विसापूर
२३. सोनगड
पुरन्दरचा वेढा व तह
सुरतेवर छापा: या विजयांनंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशहाच्या सेना महाराष्ट्रात धुमाकुळ घालत होत्या, तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.कुठे पुणे व कुठे सुरत? सुरत म्हणजे त्या वेळीची मुघली मुलाखतील मोठी व्यापारपेठ. खुप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयाची लुट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशीदी यांना हात लावला नाही.
पुरन्दरच्या तहाचे परिणाम
या तहानुसार राजांनी आपले तेवीस किल्ले व चार लाख होनांचे क्षेत्र बादशहाला दिले.
राजांच्या ताब्यात बारा किल्ले आणि लाख होनांचे क्षेत्र राहिले.
मिर्झाराजांनी चाळीस लाखांची खण्डणी राजांवर लादली.वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले.
सम्भाजीराजांना बादशहाकडून पाच हजाराची मनसब मिळाली.
तहातील कलमांची पुर्तता होईपर्यंत सम्भाजीराजे मिर्झाराजाकडे ओलीस म्हणून राहीले.
शाहिस्तेखान
मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.
एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली.
अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेची पहिली लूट
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंह
इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
आगऱ्याहून सुटका
इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे केले. ह्या सरदाराना शिवरायांनी लढाईमध्ये हरवले होते अशा सरदारांसोबत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.
शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी राजे निसटून २४ तास झाले होते.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
सर्वत्र विजयी घोडदौड
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
दक्षिण दिग्विजय
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता.
शिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.
चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला. त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना; तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले.
यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : “परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा.”
कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.