बाजी प्रभू देशपांडे

 

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूंचा जन्म हिंदू कायस्थ परिवारामध्ये झाला. 


मराठा साम्राज्याचे लढवय्ये शूर योद्धे म्हणून आज इतिहास बाजीप्रभू देशपांडेंचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेत आहे.

त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगायला हवा या प्रेरणेने शिवाजी महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड अडवून धरली होती.

असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पहाता आले.

जीवन

बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

बाजी प्रभू देशपांडे हे अत्यंत शूर आणि निर्भीड सैनिक होते. बाजी प्रभू हे असे सैनिक होते ज्यांच्याकडे अशक्य शक्य करण्याची ताकद होती. ही कथा एका सैन्य अधिकाऱ्याची आहे ज्याने सामंत चंद्रराव मोरे यांच्या हाताखाली काम करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण चंद्रराव मोरे हे भोसले घराण्याचे शत्रू होते. ते असे लष्कर अधिकारी होते जे शिवाजी महाराजांचे कॅप्टन होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी आपले प्राण दिले.

शिवाजी महाराजांनी जावळीच्या (रायगडाजवळ) लढाईत चंद्रराव मोरे यांचा पराभव केला तेव्हा शिवाजी महाराजांचे संरक्षण अधिकारी होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूंना हिंदवी स्वराज स्थापन करण्यास पटवून दिले होते आणि त्यांना त्यांचे मित्र बनवले होते.

अफझलखानाविरुद्धच्या लढ्यात बाजी शिवाजी महाराजांचे अधिकारी होते आणि अफझलखानच्या मृत्यूनंतरही बाजीने अनेक लढाया जिंकण्यासाठी आपले प्राण दिले. बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजी महाराजांसोबत पन्हाळा किल्ल्यावर संरक्षण अधिकारी म्हणून काम केले.

म्हणूनच जेव्हा विजापूरच्या सिद्धी जोहरने पन्हाळ्यावर हल्ला केला तेव्हा बाजी प्रभू देशपांडे युद्धात महत्वाची भूमिका बजावत होते. जेव्हा त्यांना समजले की शिवाजी महाराज आणि त्यांचे काही सैनिक पन्हाळा सोडले पाहिजेत, तेव्हा बाजीने त्यांना किल्ल्यातून बाहेर पडण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

घोडखिंडीचा लढा

अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी विजापूरच्या फौजेचा धुव्वा उडविला आणि बराचसा विजापूरचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर लागलीच पन्हाळगड जिंकला.

एकीकडे हे करत असतांना दुसऱ्या बाजूस नेताजी पालकरांच्या सैन्याने विजापूरवर हल्ला चढविला. त्यावेळी सिद्दी जोहर हा विजापूरचे नेतृत्व करीत होता.

त्याने आपल्या सैन्याच्या मदतीने कोल्हापूर नजीक पन्हाळगडाला वेढा दिला व काही सरदार, सैनिक आणि शिवाजी महाराजांना गडावर स्थानबद्ध केले. हा वेढा बाहेरून फोडण्याकरता नेताजी पालकरांनी आणि सैनिकांनी बराच लढा दिला पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले.

आता एक साहसी, धाडसी आणि धोकादायक मार्ग निवडल्या गेला.

छत्रपती शिवराय, बाजीप्रभू देशपांडे आणि निवडक मावळे सिद्दी जोहरने घातलेला वेढा आतून फोडून काढतील आणि विशाळ गडाकडे प्रस्थान करतील.

यावेळी महाराज मावळ्याचा वेश धारण करतील, महाराज निसटले हे जेंव्हा सिद्दी जोहर ला समजेल तेंव्हा तो पाठलाग करेल त्यावेळी शिवा काशीद याला मेण्यात बसवून सैन्यासमवेत वेढ्याबाहेर काढायचे ठरले. हा शिवा काशीद बराचसा महाराजांसारखा दिसायचा. त्याला महाराजांचे कपडे घालण्यात आले.

भयंकर पाऊस कोसळत होता…आषाढ पौर्णिमेची १३ जुलै, १६६० सालची ती रात्र कुणाकरता काळरात्र ठरणार हे येणारा काळच ठरविणार होता.

महाराज आपल्या 500-600 मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडें समवेत सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटले. विशालगडाच्या दिशेने ते कूच करते झाले, जोहरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. मेण्यात बसलेले महाराज आहेत असे समजून त्यांना माघारी आणण्यात आले.

शिवा काशीदला याची पूर्ण कल्पना होती कि ज्यावेळेस आपले पितळ उघडे पडेल त्यावेळी आपला जीव जाणार हे निश्चित…तरी देखील शिवा  शांतपणे शत्रूच्या स्वाधीन झाला.

त्याच्या बलिदानाने मराठी सैन्याला पुढे जाण्याकरता जास्त कालावधी मिळाला.

शत्रूला आपली चूक झाली हे समजण्यात वेळ लागला आणि ज्यावेळी त्यांना त्यांची झालेली चूक लक्षात आली तेंव्हा त्यांनी पुन्हा सैन्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

मोगलांची फौज पाठलाग करते आहे हे बाजीप्रभूंच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही,  आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले.

बाजीप्रभूंनी अर्ध्या फौजेसह शिवरायांना विशालगडावर पाठवले आणि अर्ध्या सैन्यासह भाऊ फुलाजी प्रभुंसमवेत स्वतः बाजीप्रभू शत्रूला घोडखिंडीत अडविणार होते. ज्याक्षणी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचतील त्यावेळी गडावरून तोफेचे तीन बार उडविण्यात यावे, त्यानंतर बाजीप्रभूंनी सैन्यासह घोडखिंड सोडून विशाळ गडाकडे कूच करावे अशी रणनीती ठरविण्यात आली होती.

आखलेल्या रणनीती नुसार महाराज अर्ध्या सैन्यासह गडाकडे निघाले आणि बाजीप्रभू देशपांडेनी आपल्या मावळ्यांसह घोडखिंड गाजविण्यास सुरुवात केली.

कुठे मोगलांचे 10,000 सैन्य आणि कुठे मराठ्यांचे अवघे 300 सैनिक तरीदेखील बाजीप्रभूंच्या नेतृत्वात तीनशे मावळे शत्रूला रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते. सिद्दी जोहरचे सैन्य बाजीप्रभूंनी तब्बल 18 तास घोडखिंडीत रोखून धरले होते.

बाजीप्रभू दांडपट्टा चालविण्यात तरबेज होते, त्या बळावर त्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बाजीप्रभू नखंशिखांत रक्ताने माखले, तरीदेखील शत्रूला आस्मान दाखवीत होते. इतके बलाढ्य सैन्य देखील बाजीप्रभूंच्या स्वामिनिष्ठे पुढे थिटे ठरले.

तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.


शिवाजी महाराज आपल्या तीनशे मावळ्यांसह विशाळगडावर गेले परंतु त्याठिकाणी देखील त्यांना सिद्दी जोहरच्या सूर्यराव सुर्वे व जसवंतराव दळवी यांच्याशी लढून गड आपल्या ताब्यात घ्यावा लागला.

महाराज सुखरूप गडावर पोहोचले…त्यावेळी गडाचा ताबा घेण्यात आला व त्याक्षणी तोफांचे हवेत तीन बार उडविण्यात आले.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. .


बाजीप्रभू यांचा केलेला सन्मान

बाजीप्रभू देशपांडे यांच्यासमवेत जोरदार लढा देणार्‍या सेनेला सन्मानाची तलवार देण्यात आली. शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातील भोर जवळील कसबे सिंध गावात वसलेल्या बाजी प्रभू यांच्या घरी व्यक्तिगतपणे भेट दिली.

त्यांच्या मोठ्या मुलाला विभाग प्रमुख म्हणून नोकरी देण्यात आली होती. इतर ७ पुत्रांना पालखीचा सन्मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा धनाजी जाधव यांना सैन्यात सामील करण्यात आले.

बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज

बाजी प्रभूंच्या वंशजांपैकी एक, रामचंद्र काशिनाथ देशपांडे हे ब्रिटिश राजवटीविरुद्धचे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी धुळे, जळगाव आणि पुणे येथे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले.

ब्रिटिश राजवटीत त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात १९ महिने तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने १९८९ मध्ये ‘विशेष कार्यकारी दंडाधिकारी’ ही पदवी दिली होती.

माध्यमांतील आविष्कार

घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबूराव पेंटर यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.

पुस्तके

  • वीरश्रेष्ठ बाजीप्रभू देशपांडे (पंडित कृष्णकांत नाईक)

  • शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे (प्रभाकर भावे)


चित्रपट

  • पावनखिंड

एकूण पृष्ठदृश्ये