संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

 अष्टप्रधान मंडळात एकूण आठ पदे असत व ही पदे पुढीलप्रमाणे पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य, सचिव अथवा सुरनीस, डबीर अथवा सुमंत, सरसेनापती, पंडितराव अथवा दानाध्यक्ष, वाकनीस आणि मुख्य न्यायाधीश.

मुख्य प्रधान अथवा पेशवा 

शिवाजी महाराजांच्या काळात मुख्य प्रधान असलेले मोरोपंत पिंगळे हे सुरुवातीस काही काळ संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होते मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीसच संभाजी महाराजांविरोधात झालेल्या कटात त्यांचा थेट सहभाग असल्याने त्यांना पेशवेपदावरून दूर करण्यात आले. कालांतराने संभाजी महाराजांनी मोरोपंत यांचे पुत्र निळोपंत यांना मुख्य प्रधान केले. 

मुजुमदार अथवा अमात्य 

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस रघुनाथ नारायण हे अमात्यपदी होते. अण्णाजी दत्तो यांच्या पहिल्या अटकेनंतर सुटका करून त्यांचा पूर्वीचा सचिव (सुरनीस) हा किताब काढून संभाजी महाराजांनी त्यांना अमात्यपद दिले. पुढे रघुनाथ नारायण यांनासुद्धा चंदी येथे कैद करण्यात आल्याचे उल्लेख सापडतात. अण्णाजी दत्तो यांना देहांत शासन दिल्यावर संभाजी महाराजांनी अमात्यपदाची जबाबदारी खंडेराव पानसंबळ यांच्याकडे दिली. पुढे रघुनाथ नारायण यांची सुटका झाल्यावर ते संभाजी महाराजांना येऊन भेटले यावेळी संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा त्यांना अमात्यपदाची जबाबदारी दिली. त्यांचा मृत्यू झाल्यावर संभाजी महाराजांनी रघुनाथ नारायण यांचा पुत्र नारायण रघुनाथ यांच्याकडे अमात्यपदाची जबाबदारी दिली.

सचिव अथवा सुरनीस 

शिवाजी महाराजांच्या काळात अण्णाजी दत्तो यांच्याकडे असलेले हे पद संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडेच सुरुवातीस होते मात्र कटात त्यांचा मुख्य सहभाग उघड झाल्यावर हे पद त्यांच्याकडून काढून घेऊन आबाजी सोनदेव यांच्याकडे देण्यात आले. आबाजी सोनदेव यांच्या मृत्यू नंतर सचिवपद रामचंद्र नीलकंठ यांच्याकडे देण्यात आले. १६८५ च्या दरम्यान शंकराजी नारायण (भोरच्या पंतसचिव घराण्याचे संस्थापक) यांना हे पद देण्यात आले. 

डबीर अथवा सुमंत 

जनार्दन हणमंते हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुमंत पदावर होते ते त्यांच्या मृत्यूपर्यंत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही सुमंतपदावर होते. पुढे हे पद वासुदेव जनादर्न यांच्याकडे सोपवण्यात आले आणि त्यानंतर बाळकृष्ण वासुदेव यांनी ही जबाबदारी सांभाळली. 

सरसेनापती 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर निर्माण झालेल्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती पदाचा मान हंबीरराव मोहिते यांना  प्राप्त झाले आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत हे पद त्यांच्याकडेच कायम होते. संभाजी महाराजांविरोधात झालेल्या कटाचा निकाल हंबीरराव मोहिते यांनीच लावला. सन १६८७ साली मुघल सैन्याने वाई येथे धडक मारली यावेळी प्रतिकार करताना तोफेचा गोळा लागून हंबीरराव यांचे निधन झाले. हंबीरराव यांच्यानंतर मालोजी घोरपडे हे सरसेनापती झाले. 

पंडितराव अथवा दानाध्यक्ष 

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोरेश्वर पंडित हे दानाध्यक्ष असून संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही तेच दानाध्यक्ष होते. केशव पंडित हे सुद्धा दानाध्यक्ष असल्याचा उल्लेख परमानंदकाव्यात येतो मात्र त्यांनी लिहिलेली पत्रे उपलब्ध नाहीत.

वाकनीस 

दत्ताजी त्रिमल हे शिवाजी महाराजांच्या काळात वाकनीस होते ते संभाजी महाराजांच्या पूर्ण कारकीर्दीपर्यंत वाकनीस होते. कर्नाटक प्रांताची जबाबदारी दत्ताजी त्रिमल यांच्याकडेच होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र रामचंद्र दत्ताजी हे मुतालिक म्हणून काम पाहत होते.

मुख्य न्यायाधीश 
संभाजी महाराजांचे मुख्य न्यायाधीश प्रल्हादजी निराजी हे होते. मधल्या काळात
त्यांनी काही काळ मुख्य प्रधान या पदाची जबाबदारी सुद्धा निभावली होती असे त्यांच्या काही पत्रांवरून समजते. त्यांनी दिलेले निवाडे कविलकलश अमलात आणत असत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये