किल्ल्यांचे इतिहास, महत्व आणि प्रकार

 


शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सोप्प जावे आणि आसपासच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून बांधलेली इमारतीचा अथवा वास्तूचा इंग्रजी भाषेत फोर्ट(Fort), कॅसल(Castle), सिटॅडल(Citadal), बर्ग(Burgh) इ.संज्ञांनी उल्लेख होतो. मराठीत दुर्ग,किल्ला,गढी, कोट,गड, इ. संज्ञांनी उल्लेख होत असतो.किल्ल्याचे बांधकाम आणि उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आला आहे.

प्राचीन भारताविषयी बोलायचं झालंच तर सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली हडप्पा संस्कृती आणि या संस्कृतीच्या हडप्पा शहरास तटबंदी होती आणि मध्यभागी बालेकिल्ला बांधलेला होता असे पुरातन विभागाच्या उत्खननात आढळून आले आहे.वेदकाळात आणि ब्राम्हणकाळात देखील शहराला तटबंदी बांधून त्याच्या भोवती संरक्षण खंदकाची रचना केली जात असे.कौटिल्याचे अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचा पायाच, परंतु यात देखील किल्ल्याच्या स्थापत्यविषयी जे वर्णन आढळते ते किल्ल्याची बांधणी शैलीचे वैशिष्ट्य दाखवते.

पाटलीपुत्र शहराविषयी जे अवशेष आढळले त्यात असे आढळते की शहराभोवती भक्कम अशी तटबंदी होती आणि खंदकाची रचना देखील केलेली होती.गुप्त, राष्ट्रकूट घराण्यांच्या काळात किल्ल्याला महत्व नव्हते अस म्हणता येईल परंतु स्वतःचे राजवाडे ते तटबंदीने भक्कम सुरक्षित करत.मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार आणि यादवांच्या काळात किल्ल्यांचे महत्व अगणित वाढले.एकूण किल्ल्यांपैकी सर्वात जास्त किल्ल्यांचे मूळ हे याच काळात आहे, परंतु आज दिसत जरी नसले तरी दौलताबाद(देवगिरी), साल्हेर मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, रांगणा,पावनगड,पन्हाळा, विशाळगड हे मुसलमानपूर्व काळातीलच किल्ले आहेत.

मुसलमान काळात अनेक किल्ले बांधण्यात आले त्यातील दिल्ली,आग्रा,अहमदनगर, विजापूर,तुघलकाबाद, बंगलोर ही तत्कालीन भुईकोट किल्ल्यांची प्रसिद्ध उदाहरणे आहेत.राजपुतांनी चितोड, जोधपूर, ग्वाल्हेर सारखे डोंगरिकिल्ले बांधले.  १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक नवीन किल्ले बांधले आणि काहि जुने किल्ले डागडुजी करून इमारती,तळी आणि तटबंदी यांची निर्मिती करून लढाऊ बनवले.

किल्ल्यांचे महत्व-



महाराष्ट्र हा डोंगरदऱ्यानी समृद्ध असा प्रदेश, त्यामुळे अशा प्रदेशात किल्ल्याचे महत्व असाधारण होते.रामचंद्र पंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहिताना किल्ल्याचे महत्व सांगतात, "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग; दुर्ग नसता मोकळा देश. परचक्र येताच निराश्रय प्रभाभग्न होऊन देश उध्वस्त होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयावर परिहार केले"

"गडकोटाचा आश्रय नसता फौजेच्याने परमुलखी टिकाव धरून राहवत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेच नाही. इतक्याचे कारण ते गडकोटविरहित जे राज्य त्या राज्याची स्थिति म्हणजे अभ्रपटल न्याय आहे याकरिता ज्यास राज्य पाहिजे, त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ.गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरंवशावर न राहता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानू नये"
अमात्यांच्या या अज्ञापत्रातील दोन परिच्छेदानवरून त्या काळात गडकोटाला किती महत्व होते हे जाणून येते. हे अमात्यांच्या लेखणीतून जरी आलेले असले तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळात महाराज या सर्व मूल्यांना धरून स्वराज्याची वाटचाल करत होते हे आपल्याला माहितीच आहे.

स्वराज्याची मुहूर्तमेढ ही रोहिडेश्वराचा डोंगर जिंकून झाली होती आणि स्वराज्याचे तोरण हे तोरणा किल्ला जिंकूनच झाले होते. यानंतर स्वराज्याचे पुढचे प्रत्येक पाऊल हे किल्ले जिंकतच पुढे पडत राहिले.

किल्ल्यांचे प्रकार-

स्वराज्याच्या रक्षणाचे एक प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. राज्याच्या सप्त अंगांत दुर्ग हे एक महत्वाचे अंग आहे.

वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.
किल्ल्याच्या स्थानावरून आणि बांधणीवरून "अभिलाषितार्थचिंतामणी" या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वरदेव यांनी किल्ल्यांचे नऊ प्रकार केले आहेत ते असे,
१ निसर्गसिद्धीत जलाने वेष्ठीत असा तो जलदुर्ग
२ दुर्घट चढाच्या व पाण्याच्या सोयीने समृध्द अशा शिखरावरील गिरिदुर्ग
३ पाषाणात भक्कम बांधून काढलेला तो अष्मदुर्ग
४ विटाचुन्याने बांधलेला व खंदकाने वेष्ठीत तो इष्टिकादुर्ग
५ चिखलमातीतच बांधून काढलेला तो मृतिकादुर्ग
६ दाट काटेरी झाडांच्या कुंपणाने संरक्षित तो वाक्षर्य किंवा वनदुर्ग
७ ओसाड व जलहीन प्रदेशात मध्येच पाण्याच्या आश्रयाने बांधलेला तो मरुदुर्ग
८ वेळू किंवा लाकडाचा कुड किंवा भिंती यांचा सभोवार तट असलेला तो दारुदुर्ग
९ शस्त्रास्त्रासहित शूर योद्ध्यांनी रक्षण केला जात आहे तो नृ किंवा नरदुर्ग

 जलदुर्ग

भुईकोट


"शिवतत्त्वरत्नाकर" या ग्रंथाचा कर्ता बसवराज यांनी किल्ल्यांचे आठ प्रकार पाडलेले आहेत ते पुढीलप्रमाणे,
१ मृण्मयी (मातीचा किल्ला)
२ जलात्मिका (जंजिरा)
३ ग्रामकोट (गावचे कूस)
४ गव्हर (गुहा)
५ गिरिकोट (डोंगरी किल्ला)
६ भटवरा (नरदुर्ग)
७ वक्रभूमी
८ विषम

 वनदुर्ग


यासोबत १६ व्या शतकात "आकाशभैरवकल्प" या नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला आहे.हा ग्रंथ एका कवीने लिहिला आहे. हा कवी विजयनगरच्या राज्याचा आश्रित होता. त्याच्या नुसार पुढीलप्रमाणे किल्ल्याचे ८ प्रकार पडतात,
१ गिरिदुर्ग
२ वनदुर्ग
३ वारक्ष म्हणजेच गुहा किंवा निबिड अरण्यातील दुर्ग
४ जलदुर्ग (जंजिरा)
५ चिखल मातीत बांधलेला म्हणजे पंकदुर्ग
६ नाभीच्या आकाराचा वाळवंटातील किंवा ओसाड मैदानातील नाभी किंवा मिश्रदुर्ग
७ नरदुर्ग (योध्याचे वलय)
८ कोष्टदुर्ग (कोटांचा किल्ला)

गिरिदुर्ग



तीनही याद्यांवरून त्यातील समानता लक्षात येते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर रघुनाथपंत हणमंते यांच्याकडून 'राज्यव्यवहारकोश' नावाचा एक पारिभाषिक कोश तयार करून घेतला.त्यात २६ श्लोकांचे वनदुर्ग म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आलेले आहे. त्यात किल्ल्यांचे मुख्य असे ३ प्रकार सांगितले आहेत ते असे,

१ गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला
२ भुईकोट किल्ला
३ द्वीपदुर्ग किंवा जंजिरा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये