तुळजाराजा भोसले दुसरे (इ.स. १७६३-१७८७)
प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर तुळजा राजा दुसरे गादीवर आले. यांचाही काळ बराच धामधुमीचा होता. अर्काटचा नवाब महम्मदअली प्रतापसिंह यांच्या कारकिर्दीपासून आतल्या आत धुमसत होता. तुळजा राजांच्या कारकीर्दीत अर्काटचा नबाब याने तंजावरविरुद्ध हालचाली सुरू केल्या.
याच सुमारास कर्नाटकाचा राजकारणात हैदरअलीचा उदय झाला. १७६१ मध्ये प्रबळ झालेल्या हैदरअलीने नंदराजाच्या हातातून सत्ता बळकावून तो मैसूरचा सूत्रधार बनला. हैदरअलीस इंग्रज व अर्काटचा नवाब यांना शह देऊन आपली सत्ता कर्नाटकात निर्माण करावयाची होती. त्यासाठी हैदरअलीने त्रिचनापल्ली व तंजावरपर्यंत स्वाऱ्या करून दहशत निर्माण केली.
तुळजाराजा मात्र सर्व बाजूंनी कैचीत सापडले. अर्काटचा नवाब इंग्रज व हैदर अली यासारख्या शत्रूंनी ते चारी बाजूने वेढले गेले. या शत्रूंना तोंड देण्यात तुळजाराजा असमर्थ होते. त्यामुळे तुळजाराजांनी महाराष्ट्रात मराठ्यांकडे संधान साधले. शत्रु प्रबळ असल्यामुळे मराठे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तथापि पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना सावरण्यास वेळ लागत होता.
तुळजाराजांनी यास्तव हैदरअलीस चार लाख रुपये रोख व पाच हत्ती नजर देऊन आपला बचाव केला. हा तह मराठ्यांच्या सल्लामसलतीने केला असावा असे कै. पारसनीस यांचे मत आहे.
१७७६ मध्ये तंजावरचे राज्य इंग्रजांच्या स्वामित्वाखाली गेले. अर्काटचा नवाब, मैसूरचा हैदरअली, कर्नाटकाचा नवाब, फ्रेंच आणि इंग्रज या सर्वांचा त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू होता, यात अखेरीस इंग्रजी यशस्वी झाले. १७७६ च्या तहाप्रमाणे तंजावरचा राजा इंग्रजांचा मांडलिक बनला. दुसऱ्या कोणत्याही राज्याशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय संबंध ठेवण्याचे अधिकार तंजावरचा राजाला राहिले नाही. त्यामुळे तंजावरचा राजा हा इंग्रजांच्या हातचे बाहुले बनला.
इंग्रजांनी तंजावरावर वर्चस्व प्रस्थापित केलेले पाहून हैदरअली संतप्त झाला जून १७८१ च्या अखेरीस हैदरने तंजावरावर स्वारी केली. परंतु यात हैदरअलीचा पराभव झाला.
तुळजा राजा स्वतः विद्वान आणि रसिक होता. मराठी भाषेतून राजाने भक्तिपर पदे लिहिली. त्यांच्या दरबारातही मराठी भाषेत रचना करणारे अनेक कवी होते. कृष्णकवी, रामकवी, शेषकवी आदि कवी तुळजाराजांच्या आश्रयाखाली होते. इसवी सन १७८७ मध्ये तुळजा राजांचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा