मराठ्यांच्या इतिहासामध्ये तंजावरच्या भोसले राजवटीचे प्रसंगानुरूप अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आढळतात. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर म्हणजे सतराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण मोहीम हाती घेतल्यावर मराठे आणि तंजावरचे भोसले यांचे राजकीय संबंध या ना त्या कारणाने वारंवार आलेले दिसून येतात.
१६७१ मध्ये व्यंकोजींनी स्वपराक्रमाने तंजावर जिंकून घेतले. व्यंकोजी राजांच्या कारकीर्दीपासून तंजावरचे महाराष्ट्रातील भोसल्यांशी संबंध येऊ लागले. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे यांच्यात वडिलोपार्जित जहागिरी वरून संघर्ष उत्पन्न झाला. अर्थात हा संघर्ष वगळता पुढे तंजावर आणि मराठी सत्ता यांच्यात परस्पर सहकार्याचे संबंध आले.
शंभूराजेंच्या काळात शाहराजा दुसरा यांनी चिदंबरम मधे नटराजाच्या मूर्तीची स्थापना केली. राजारामांच्या काळात मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात महाराज यांनी राजाराम यांना मदत केली या शिवाय शिवकालोत्तर काळात तंजावरचे राज्य जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा मराठ्यांनी त्यांना मदत पाठविली. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तंजावरकरांनी कधी मराठ्यांची तर कधी इतर राज्यांची मदत घेतली. विशेषतः प्रतापसिंह छत्रपतींच्या कारकिर्दीत (१७३८-६३) मराठे व तंजावरचे सातत्याने संबंध आलेले दिसतात.
मराठ्यांच्या इतिहासात मराठे व तंजावरच्या भोसले यांचा संबंध हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तंजावरचे राज्य लहान आणि मांडलिक राज्य असले तरी या राज्यामध्ये मराठी संस्कृतीचा विस्मयकारक विकास घडून आला. समर्थ मराठ्यांची सत्ता ज्या महाराष्ट्रात होती त्या प्रदेशातही नृत्य,नाट्य आणि आणि इतर कला यांमध्ये जो विकास घडून आला नाही तो तंजावरला घडून आला हे एक स्वतंत्र वैशिष्ट्य ठरले.
त्याचप्रमाणे नृत्य, संगीत, शिल्प, चित्रकला या क्षेत्रातही तंजावरच्या मराठा राज्यात नेत्रदीपक प्रगती घडून आले या दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासातील तंजावरचे स्थान लक्षात घेतले पाहिजे. असा हा तंजावरच्या मराठी सत्तेचा विषय महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा ठरतो.
परंतु या विषयाच्या अभ्यासाठी आतापावेतो उपेक्षाच झालेली दिसते. मराठ्यांच्या इतिहासात व्यंकोजीराजे सोडले तर तंजावरच्या कोणत्याही राज्यकर्त्याचा उल्लेखही क्वचितच आढळतो.
वास्तविक पाहता तंजावरच्या सरस्वती महालामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला उपयुक्त असणाऱ्या असंख्य कागदपत्रांचा आणि हस्तलिखितांचा खजिना आहे. याच सरस्वती महालात दिवेकरांना महत्वपूर्ण अश्या "शिवभारताचा" शोध लागलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा