छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध तसेच युरोपियन शक्तींशी संघर्ष करून रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले. इ.स. १६७४ मध्ये शिवरायांचा मराठा साम्राज्याचे 'छत्रपती' म्हणून राज्याभिषेक झाला.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक किल्लेही उभारले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.